वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.



माझ्या मते वैचारिक साहित्य म्हणजे लेखकाने सत्याचा आधार घेऊन स्वतःचे विचार परखडपणे लिहिलेले साहित्य. हे साहित्य वाचकाच्या विचारांना चालना देण्याचे आणि मतपरिवर्तन करण्याला कारणीभूत ठरते. वाचकाला तात्विक, तर्कसुसंगत आणि ज्ञानाधिष्ठित विचारांचे खाद्य देऊन वैचारिक प्रगतीच्या वाटेवर दोन पाऊले पुढे घेऊन जाण्याचे काम ह्या साहित्याने गेली अनेक शतके केले आहे. वैचारिक साहित्याकडे आकृष्ट होऊन त्याचा अभ्यास करण्याचा विचार करणारी वाचकमंडळी म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या वाटेवरचे वारकरीच आहेत जणू!   



वैचारिक साहित्याचे वेगळेपण- ललित साहित्यात लेखक भाव, कल्पना, कुतूहल, भीती अशा भावनांना चालना देत असतो तर वैचारिक साहित्यात फक्त विचारांना  वैचारिक आणि मत परिवर्तनाला महत्व असते. मेंदूला झिणझिण्या आणणारे शब्द आणि त्यांचे अर्थ येथे उतरविलेले असतात! वैचारिक साहित्य लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी घेत असते!


वैचारिक साहित्य वाचताना लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मतांना/मान्यतांना आव्हान मिळाले म्हणून वाचन थांबवणे.. वैचारिक लेखन करणारा हा अनुभवसिद्ध आणि आपल्या विचारातून मत परिवर्तन करण्याची क्षमता असणारा लढवय्या असतो आणि म्हणूनच आपल्या विचारप्रक्रियेला तो आव्हान द्यायचे काम करत असतो.


प्रबोधनकार ठाकरे, जयसिंगराव पवार, अच्युत गोडबोले, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, गिरीश कुबेर, साळुंके, नरेंद्र दाभोळकर, नरहर कुरुंदकर हे काही वैचारिक खाद्य पुरवणारे लेखक आहेत. ह्यांचं किमान एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे, वैचारिक प्रगल्भतेसाठी!




गोष्ट लेखकाला बसलेल्या वैचारिक धक्क्याची आणि त्याने ती आपल्या लिखाणात कशी उतरवली ह्याची :



नरहर कुरुंदकर हे राजकारणावर कसे लिहायला लागले याविषयी त्यांनी सांगितलेली आठवण: कुरुंदकर म्हणतात की, यदुनाथ थत्तेंनी त्यांना राजकारणाविषयीच्या एका दुःखद सत्याची जाणीव करून दिली, "जे सगळ्यांना माहीत असलेले, ज्ञात असलेले सत्य आहे असे आपण समजतो, पण ते तसे नसते". आणि हेच सत्य अतिशय परखडपणे वाचकांपर्यन्त पोहचवले. कुरुंदकरांचे वैचारिक लिखाण आपल्या जाणिवांना धक्के देण्याचे आणि जागृत करण्याचे काम नेटाने करत आहे.



काय मग मंडळी, कधी सुरुवात करताय वैचारिक साहित्य वाचायला?


.. आणि तुम्ही जर असे साहित्य वाचत असाल तर तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट करून नक्की सांगा!



Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

ह्या आठवड्यात मी काय वाचू?