पुस्तक परिचय - सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले - जी. ए. उगले



सनावळ्या, जयंत्या-पुण्यतिथ्या, हारतुरे, तसबिरी म्हणजे इतिहास नाही - ते झालं इतिहास “मिरवणं”! आपण फक्त हेच जर करत बसलो तर मग या सर्वांच्या मागे काय दडलंय ते कधी समजावून घेणार?🎯 इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने वाचन/आकलन करणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले हे पुस्तक तसेच अभ्यासपूर्ण आहे.


“ज्योतीबांच्या सावली सावित्रीबाई” ह्यापलीकडे एक स्वतंत्र समाजसुधारक, स्त्री उद्धारक, शिक्षण प्रसारक, कवयत्री आणि दीनदुबळ्यांची आई म्हणून सावित्रीबाई कशा होत्या? हे ९ भागांमध्ये ह्या पुस्तकात मांडले आहे.. सुरवात होते तीच त्यांच्या शैक्षणिक कार्यातील अमूल्य योगदानाने..

- भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी केलेले काम - इतर स्त्री शिक्षिकांना दिलेले प्रोत्साहन - सहन केलेल्या हाल-अपेष्टा - ज्योतिबांसोबत नगरच्या शाळांना दिलेल्या भेटी - आरंभलेली शैक्षणिक क्रांती लेखकाने अशा विषयांवर माहितीपूर्ण भाष्य केले आहे.


सावित्रीबाईंचे - सामाजिक कार्य - दुष्काळग्रस्तांना केली मदत - पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळेस रुग्णांची केलेली सेवा - बालहत्या प्रतिबंधकग्रहाची स्थापना आणि देखभाल यावर दुसऱ्या भागात प्रकाश टाकला आहे. तसेच त्यांचे विचार, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले वागणे, ज्योतिबांशी असलेले बरोबरीचे नाते हे पण छान उलगडून दाखविले आहे. लेखकाने सावित्रीबाईंची ४-५ पत्रे मिळवून त्यात त्यांनी मांडलेली व्यथा, समाज बदलण्याची असलेली तळमळ आणि त्यासाठी लागेल ते करण्याची तयारी याचा उहापोह केला आहे.

तसेच फारशी समोर न आलेली भाषण संपदा पण चर्चिली आहे - “विद्यादान” ह्या भाषणात सावित्रीबाई म्हणतात, आळस, परावलंबन वैगरे दुर्गुण रोखण्यास या मनुष्याचे सद्गुण वाढण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल, तर “विद्यादान” होय. या दानाने देणारे आणि घेणारे खरेखुरे माणसे बनत असल्याचा दावा त्या करतात. “शिक्षणाशिवाय क्रांती शक्य नाही” हेच खरे!

सावित्रीबाई एक कवयित्री म्हणून पण तेवढ्याच संवेदनशील होत्या. त्यांच्या काही ओळी: बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही पशू पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का? गुमगिरीचे दुःख नाही जराही त्यास जाणवत नाही माणुसकीही समजत नाही तयास मानव म्हणावे का? शब्दातून पण समाजप्रबोधन 📚!

यापुढे सावित्रीबाईनी सत्यशोधक समाजाचे केलेल्या कार्याची नोंद घेतली आहे - भीषण दुष्काळात उभारलेल्या कॅम्पमध्ये एक हजार निराधार बालकांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांनी केली आणि त्याना नवजीवन दिले. ज्योतिबांचे अनेक उपक्रम त्यांनी कित्येकी वर्ष चालू ठेवले होते. धन्य ती माता!

लेखकाने करून दिलेले हे सावित्रीदर्शन फार विलोभनीय आहे ❤️! ह्या महान कार्याचा परिचय न झाल्याने गेले शतकभर त्यांची उपेक्षाच केली गेली आहे. ही उपेक्षा थांबवायची असेल तर सकल स्त्री-पुरुषांनी सतर्क राहून त्यांचा खरा इतिहास वाचला पाहिजे व त्यांच्या विचारांना आत्मसात केले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?